डेब्ट फंडांमध्ये जोखीम मुळीच नसते का?

Video

डेब्ट फंड इक्विटी मध्ये गुंतवणूक करीत नाहीत त्यामुळे त्यांत जोखीम मुळीच नसते, हा समज चुकीचा आहे. हे खरे आहे की इक्विटी फंडांच्या तुलनेत डेब्ट फंडांमध्ये कमी जोखीम असते, पण याचा अर्थ असा होत नाही की डेब्ट फंड याची गॅरंटी देतात की तुमच्या पैशांचे नुकसान कधीच होणार नाही. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी फंडांच्या विपरीत डेब्ट फंड, डेब्ट आणि रोखे बाजारातील रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांच्यासोबत निराळ्या प्रकारची जोखीम निगडित असते. 

डेब्ट फंडांमध्ये व्याज दराची जोखीम असते, क्रेडिट जोखीम असते आणि लिक्विडिटी म्हणजे पैसे लगेच काढता येण्याची जोखीम असते आणि आपण सर्वांना माहीत असलेल्या स्टॉक मार्केटच्या जोखमीपेक्षा या जोखमी निराळ्या असतात. दैनंदिन जीवनात जरी हे जोखीम स्टॉक मार्केटच्या जोखमीएवढे स्पष्ट नसतात, तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

व्याज दराची जोखीम म्हणजे व्याज दरांमध्ये होणाऱ्या बदलामुळे डेब्ट फंडांनी गुंतवणूक करून ठेवलेल्या बाँडच्या किंमतींवर पडणारा प्रभाव. क्रेडिट जोखीम तेव्हा उद्भवते जेव्हा डेब्ट फंडांनी गुंतवणूक करून ठेवलेले बाँड जारी करणाऱ्या कंपनीसमोर आर्थिक संकट उभे राहते, कारण त्यामुळे या बाँडवर मिळणारे व्याज आणि मुद्दल परत मिळेल किंवा नाही हे निश्चित नसते. डेब्ट फंडाने गुंतवणूक केलेल्या डेब्ट रोख्यांमध्ये सतत व्यवहार (खरेदी/ विक्री) न झाल्याने लिक्विडिटीची जोखीम उत्पन्न होते आणि अशाने फंडला असे रोखे विपरीत परिस्थितीमध्ये कमी दरामध्ये विकावे लागू शकतात. त्यामुळे डेब्ट फंडमध्ये गुंतवणूक करणे इक्विटी फंडांच्या तुलनेत जरी थोडे कमी जोखमीचे असले तरीही जोखीम संपूर्णपणे संपत नाही.

454