लता आणि नेहा ह्या दोन मैत्रिणींनी वेगवेगळ्या वयांत गुंतवणूक करायला सुरुवात केली. लता 25 वर्षांची असताना तिने दरमहा रु. 5000 गुंतवायला सुरुवात केली आणि नेहाने सुद्धा वयाच्या 35व्या वर्षी तशीच गुंतवणूक सुरु केली. 12% चा सरासरी रिटर्न्स गृहीत धरला, तर वयाच्या 60व्या वर्षी त्यांच्या गुंतवणुकीचे पोर्टफोलिओ काहीसे असे दिसतील:
- वयाच्या 60व्या वर्षी, लताच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये रु. 21 लाख गुंतवलेले असतील, आणि तिच्या पोर्टफोलिओचे मूल्य रु. 3.22 कोटी असेल
- वयाच्या 60व्या वर्षी, नेहाच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये रु. 15 लाख गुंतवलेले असतील, आणि तिच्या पोर्टफोलिओचे मूल्य रु. 93.94 लाख असेल.
तुम्ही पाहू शकता, लताचा पोर्टफोलिओ खूप जास्त वाढला कारण तिने नेहापेक्षा लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली. लवकर गुंतवणूक केल्यामुळे चक्रवाढीचा फायदा मिळतो आणि आपल्या गुंतवणुकांवरील मोबदला येणाऱ्या वर्षांत1 वाढवण्याची संधी मिळते.
कृपया नोंद घ्या की लेखामधील गणना/कैलकुलेशन फक्त उदाहरणादाखल केलेल्या आहेत.
बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व
आर्थिक बचत आणि गुंतवणूक करण्याच्या सवयी आपल्याला आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास आणि आपले भविष्य सुरक्षित करण्यास मदत करू शकतात.
बचतीमुळे आपल्याला संकटकाळी, अनपेक्षित खर्चांसाठी लागणार पैसे जमा करता येतात. गुंतवणुकीतून आपण आपल्या पैशाला कामाला लावतो आणि कालांतराने जास्त उत्पन्न मिळवतो, ज्यामुळे आपल्याला संपत्ती उभारता येते आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येये साध्य करता येतात.
बचत आणि गुंतवणूक करून, आपण आपला आर्थिक पाया भक्कमपणे रचू शकतो, आपल्या आर्थिक गरजा सक्षमपणे भागवू शकतो, आणि आपले भविष्य जास्त सुखकर आणि सुरक्षित होईल ह्याची खात्री करू शकतो. दीर्घकाळात जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी गुंतवणुकीस लवकर सुरुवात करणे, शिस्तबद्ध राहणे व ह्या सवयींत सातत्य राखणे गरजेचे असते.
लवकर गुंतवणूक सुरु करण्याचे पाच फायदे
लवकर गुंतवणूक सुरु करण्याचे फायदे सांगावेत तेवढे कमी आहेत. तुम्ही गुंतवणूक ताबडतोब सुरु का करावी ह्याची पाच प्रमुख कारणे पाहा:
- चक्रवाढीची शक्ती
जेवढ्या लवकर सुरुवात कराल, तेवढा तुमच्या गुंतवणुकीला वाढण्यास आणि चक्रवाढ होण्यास जास्त वेळ मिळतो. चक्रवाढीच्या शक्तीचा अर्थ असा की तुम्ही कमावलेल्या पैशांवर तुम्ही आणखी पैसे कमावता, आणि कालांतराने, छोट्या गुंतवणुकासुद्धा मोठ्या रकमेत बदलतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरवर्षी 12% मोबदला देणाऱ्या एसआयपीमध्ये दरमहा रु. 500 ने जरी सुरुवात केलीत, तर 30 वर्षांनी तुम्ही 17.47 लाख रुपये जमवलेले असतील.
- बाजारातील चढ-उतारापासून सावरण्यासाठी जास्त वेळ मिळतो
लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला बाजारातील घसरणींपासून किंवा चढउतारांपासून पूर्ववत होण्यास व तुमची आर्थिक ध्येये साध्य करण्यास जास्त वेळ मिळतो. लवकर सुरुवात करून, गुंतवणुकांबाबतीत जास्त रिस्क घेणे तुम्हाला परवडू शकते आणि तुमच्या गुंतवणुकांनी चांगली कामगिरी नाही केली तरी परिस्थिती पूर्ववत करण्यास वेळ मिळू शकतो.
- पैसे हाताळायची शिस्त लागते
लवकर गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक शिस्त लागते आणि तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये नियमितपणे योगदान द्यावे लागते. ह्या सवयीमुळे तुम्हाला पैशासंदर्भात चांगल्या सवयी लागू शकतात आणि तुमची आर्थिक ध्येये साध्य होणे सोपे होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही दरमहा एसआयपीमध्ये एक छोटी रक्कम गुंतवून तुमच्या गुंतवणुकीची सवय स्वयंचलित करू शकता.
- आर्थिक सुरक्षा जास्त चांगली मिळते
लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमची आर्थिक ध्येये साध्य करण्यास आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत होते. लवकर गुंतवणूक करून, तुम्ही कालांतराने उल्लेखनीय रक्कम जमा करू शकता, जिच्या आधारे तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि मनाची शांतता मिळू शकते.
- अंगावर कमी जबाबदाऱ्या असताना जास्त गुंतवणूक करता येते
तुम्ही तरुण वयात गुंतवणूक सुरु करता, तेव्हा तुमच्या अंगावर सहसा कमी जबाबदाऱ्या असतात. म्हणजेच तुम्ही गुंतवणुकीसाठी जास्त पैसे बाजूला काढू शकता. तुमचे वय वाढत जाईल, तशा तुमच्या अंगावर जास्त आर्थिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, उदा. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आणि वैद्यकीय खर्च, इ. ह्यामुळे कदाचित तुम्हाला जास्त मोठी रक्कम गुंतवण्यासाठी वाव शिल्लक राहणार नाही.
गुंतवणूक कशी सुरु करावी?
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा दीर्घकाळात संपत्ती उभारण्याचा एक उत्तम मार्ग आहे. भारतामध्ये म्युच्युअल फंडांत गुंतवणूक सुरु करण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींचे पालन करू शकता :
- गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी, तुमच्या गुंतवणुकीची ध्येये जाणणे महत्त्वाचे असते. ह्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायची आहे हे ठरवण्यास मदत होईल.
- एकदा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे ध्येय समजले, की तुमच्या गरजा भागवण्यासाठी अनुरूप असणारा म्युच्युअल फंड तुम्ही निवडू शकता. भारतात म्युच्युअल फंडांचे अनेक पर्याय आहेत, त्यामुळे थोडा अभ्यास करा आणि चांगला रेकॉर्ड असलेला3 व तुमच्या गुंतवणुकीच्या ध्येयांशी सुसंगत असलेला म्युच्युअल फंड निवडा.
- म्युच्युअल फंडांवर नियमितपणे लक्ष ठेवल्याने गुंतवणूकदारांना आपल्या फंडाच्या कामगिरीबाबत माहिती मिळत राहते आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणांमध्ये वेळच्या वेळी हवे ते बदल करता येतात. ह्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक त्यांच्या आर्थिक ध्येयांशी आणि कालमर्यादेशी सुसंगत असल्याची खात्री करता येते.
- तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येयांशी सुसंगत राहून सूज्ञपणे गुंतवणूक करण्यासाठी, एखाद्या आर्थिक तज्ज्ञाची किंवा व्यावसायिकाची मदत घेऊ शकता.
निष्कर्ष
तुम्ही लवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास, तुमच्याकडे भरपूर वेळ असेल याचा फायदा होऊन गुंतवणूक चक्रवाढ पद्धतीने वाढण्यास मदत होऊ शकते. आता तुम्हाला लवकर गुंतवणुकीचे फायदे आणि गुंतवणूक कशी सुरू करायची हे माहीत असल्याने, अजिबात वेळ न घालवता लगेचच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा!
अस्वीकरण
एएमएफआय म्युच्युअल फंड योजनांच्या विविध प्रवर्गांबद्दलची वेबसाइटवर वितरित माहिती देण्याच्या हेतुकरिता, म्युच्युअल फंड्सविषयी एक वित्तीय उत्पादन प्रवर्ग म्हणून जागृती निर्माण करण्यासाठी आहे आणि कोणत्याही विक्री प्रचारासाठी नाही किंवा व्यवसायाच्या शिफारससाठी नाही.
येथे दिलेला मजकूर एएमएफआय द्वारे जाहीररीत्या उपलब्ध माहितीच्या, अंतर्गत स्रोतांच्या आणि इतर त्रयस्थ स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला असून विश्वसनीय मानला जातो. परंतु, अशा माहितीच्या अचूकतेविषयी एएमएफआय हमी देऊ शकत नाही, तिच्या पूर्णत्वाविषयी आश्वासन देऊ शकत नाही किंवा ही माहिती बदलणार नाही असे वचन देऊ शकत नाही.
सदर मजकूर वैयक्तिक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे, जोखीम पत्करण्याची क्षमता किंवा आर्थिक गरजा किंवा परिस्थिती किंवा येथे वर्णिलेल्या म्युच्युअल फंड उत्पादनांची अनुकूलता विचारात घेत नाही. म्हणूनच, गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या व्यावसायिक गुंतवणूकदार सल्लागारांचा / समुपदेशकांचा / कर सल्लागारांचा ह्या संदर्भात गुंतवणुकीसाठीचा सल्ला घ्यावा.
म्युच्युअल फंड योजना ही ठेव योजना नसते आणि म्युच्युअल फंडद्वारे किंवा त्याच्या एएमसीद्वारे तशा बंधनकृत, हमीकृत किंवा विमेकृत नसते. त्यामध्ये अंतर्भूत गुंतवणुकांच्या स्वरूपामुळे, म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची किंवा संभाव्य उत्पन्नाची हमी देता येत नाही. ऐतिहासिक कामगिरी जेव्हा सादर होते तेव्हा ती फक्त संदर्भाच्या हेतुकरिता असते आणि भावी परिणामांची हमी नसते.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.