जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता, तेव्हा आपण मिळवलेल्या परताव्याचा एक चक्रवाढीचा प्रभाव दिसून येतो. पण जर आपण गुंतवणूक करण्यास काही वर्षांचा उशीर केलात, तर यातील फरक लक्षणीय असतो. चक्रवाढी प्रभावामुळे आपण जेवढा निधी निर्माण कराल आणि काही वर्ष आधी सुरुवात करून आपण जेवढा निधी निर्माण करू शकला असता यातील फरक फार वाढतो. याला नीट समजून घेण्यासाठी mutualfundssahihai.com/mr/what-age-should-one-start-investing पहा.
दीर्घ कालावधीमध्येच चक्रवाढीची खरी जादू दिसते कारण आपण जेवढ्या अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करता, आपल्या पैशाला वाढण्यासाठी तेवढाच अधिक कालावधी मिळतो. चक्रवाढीची शक्ती एखादी वस्तू मोठी करून दाखवणाऱ्या भिंगाप्रमाणे असते ज्याची शक्ती काळाप्रमाणे वाढत जाते. जर आपण SIP किंवा एकरकमी गुंतवणूक करण्यास उशीर केलात आणि पूर्वी केली असती त्यापेक्षा मोठ्या रकमेची गुंतवणूक जरी केलीत, तरीही आपल्यापेक्षा पाच वर्षे आधी सुरुवात करणाऱ्या व्यक्तीच्या बरोबरीने आपण येऊ शकणार नाही. SIP बाबतीत, त्याची/तिची गुंतवणूक आपल्यापेक्षा निम्म्या रकमेची असली तरी देखील आपली गुंतवणूक त्यांच्यापेक्षा कमीच भरेल. एकरकमी गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा, काही वर्षे उशीरा गुंतवणूक करण्याचा अर्थ असा होईल की इतर कोणी आपल्यापेक्षा काही वर्षे आधी एकरकमी गुंतवणूक केलेली असेल तर त्यांची गुंतवणूक आपल्यापेक्षा अधिकच भरेल. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास उशीर करण्याचा हा फार मोठा भुर्दंड आहे.
जर आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक लवकर सुरू केलीत, तर गुंतवलेली रक्कम कमी असतानासुद्धा काही दशकांच्या कालावधीनंतर आपल्या एकूण गुंतवणुकीचा निधी, आपण 10 वर्षांनंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्याच्या तुलनेत बराच मोठा असेल. हे ससा आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणेच आहे ज्यात आयुष्यात लवकर, पण कमी रकमेने गुंतवणूक सुरू केल्याने आपण आपले उद्दिष्ट आरामात पूर्ण करू शकता, पण अधिक रक्कम गुंतवून उशीरा सुरू करून तेवढा फायदा होत नाही.